
मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपी आय महायुतीकडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर ह्या निवडणूक लढवत असून मतदार संघात महायुती कडून एकसंघपणे प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. एकीकडे सोनाली घाडीगांवकर यांच्या प्रचाराचा मतदार संघात धुरळा उडत असताना विरोधकांची प्रचार मोहीम पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आडवली-मालडी मतदार संघावर खासदार नारायण राणे यांच्या विचाराचा प्रभाव असून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून या भागावर वर्चस्व आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघाने महायुतीला भरभरून मतदान केले होते. त्यात दत्ता सामंत यांच्या बरोबर सुनील घाडीगांवकर व माजी उपसभापती राजू परुळेकर व सहकाऱ्यांचा मोठा वाटा होता. तोच इतिहास आता जिल्हा परिषदेतही पुनरावृत्ती होण्यासाठी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली घाडीगांवकर यांच्याकडे पाच वर्षांचा अनुभव पाठीशी असून प्रचारासाठी त्यांनी महिलांची एक स्वतंत्र टीम निर्माण करत मतदार संघातील निरोम, मठबुद्रुक, बुधवळे, कुडोपी, श्रावण, रामगड, गोठणे, किर्लोस, असगणी, राठीवडे, घाडीवाडी, हिवाळे, शिरवंडे, असरोंडी आणि ओवळीये या सर्व गावांचा दौरा पूर्ण केला आहे. केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात रखडलेली विकासकामे मार्गी लावणे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्याने विकासाची गती वाढवणे सोपे होईल," असा विश्वास सौ. घाडीगांवकर यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व मालवण तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. ही विकासाची गती कायम राखण्यासाठी सोनाली घाडीगांवकर या बहुमताने निवडून येणे आवश्यक आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. त्यामुळे आडवली-मालडीत सौ. सोनाली घाडीगांवकर या तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा ठाम विश्वास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.










