दांपत्यास मारहाण प्रकरणी गुन्हा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 04, 2026 20:00 PM
views 44  views

कणकवली : मस्करी केल्‍याच्या कारणातून वरवडे येथील सोनू सावंत, सलीम खोत यांच्यासह पाच ते सहा जणांनी आपल्‍यासह आपल्‍या पत्‍नीस मारहाण केल्‍याची फिर्याद संकेत रामसिंग डुल्‍ट (मूळ रा.बार्देश गोवा, सध्या रा.पिसेकामते) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. संकेत डुल्‍ट यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, मंगळवारी वरवडे मुस्लीमवाडी येथील मैदानावर क्रिकेट सामने सुरू होते. त्‍यावेळी संकेत डुल्‍ट तेथे बसले होते. त्‍यावेळी सबीर खोत याचे आणि संकेत डुल्‍ट यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्‍यानंतर फिर्यादी संकेत डुल्‍ट हे घरी गेले.

त्‍यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास सोनू सावंत, सलीम खोत यांच्यासह पाच ते सहा जण घरी आले. या सर्वांनी वरवडे येथील मैदानावर झालेल्‍या किरकोळ भांडणाचा राग धरून शिवीगाळ करून मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आपली पत्‍नी आली असता तिलाही या सर्वांनी हाताच्या थापटाने मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून कणकवली पोलिसांनी वरवडे गावातील सोनू सावंत, सलीम खोत यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे करत आहेत.