
सावंतवाडी : विरोधक हे सध्या फक्त पिवळ्या कलरचे चष्मे घालून फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कावीळ झाल्यासारखं सगळं पिवळ दिसत. विकासाच्या मुद्द्यावर टीका करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला तळवडे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी लगावला.
गावडे पुढे म्हणाले, राजकारणात टीका-टिप्पणी ही चालूच असते. मात्र, आमच्या मतदारसंघातील विरोधकांनी आमच्या विकासात्मक भूमिकेवर कोणतीही टीका केलेली नाही. शेतकरी, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर विरोधकांनी आम्हाला एकप्रकारे 'पास'च केले आहे. आम्ही करत असलेल्या कामाची दखल विरोधकांनीही घेतली असून संदीप गावडे हे मतदारसंघात तगडे काम करणार असल्याचे त्यांनीही मान्य केले आहे. आंबोली परिसरात जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी संपूर्ण जिल्ह्यात महायुतीला एकतर्फी विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भविष्याबद्दल बोलताना श्री. गावडे यांनी विकासाचे 'व्हिजन' मांडले. या मतदारसंघाला मोठा ऐतिहासिक आणि राजकीय वारसा आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, आजच्या काळात निरवडे, मळगाव, नेमळे यांसारखी गावे आता केवळ गावे राहिली नसून ती शहरीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत. या भागाला आता आधुनिक पायाभूत सुविधांची अत्यंत गरज आहे. आमच्याकडे विकासाचे स्पष्ट नियोजन असल्यामुळे आम्ही या भागाचा कायापालट अत्यंत सहजपणे करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, शिवसेनेचे सुरज परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शंकर सावंत, संदीप आंगचेकर यांच्यासह महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










