काडसिद्धेश्वर स्वामींच आध्यात्मिक प्रवचन

Edited by: विनायाक गांवस
Published on: January 28, 2026 20:02 PM
views 10  views

सावंतवाडी : श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र सावंतवाडी येथे रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी श्री क्षेत्र सिद्धगिरी, कणेरी मठाचे मठाधिपती श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीज्यांच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचन व सत्संग आनंद सोहळा पार पडला. यावेळी स्वामीजींनी उजवा आणि डावा हा भेदभाव ईश्वराने केला नसून माणसाने उजवा चांगला आणि डावा अपशकुनी ठरवलं आहे. उजवा हात, उजवा पाय पहिला टाकायचा आणि डावा नंतर ही मानवाची बुद्धी आहे. ईश्वराने मानवी शरीराला जे अवयव दिलेत ते समान दिले आहेत. त्यात भेदभाव केला नाही मग आपण का करायचा? डावा हातच नसता तर उजव्याला महत्त्व आले असते का? असे सांगत डावा उजवा हा भेदभाव करणे कसे चुकीचे आहे याचे आपल्या प्रवचनातून स्पष्टीकरण दिले. 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, "विद्या ही दोन प्रकारची असते; एक परा विद्या आणि दुसरी अपरा विद्या. अपरा विद्या पोट भरण्याचे ज्ञान देते म्हणजे ज्या चौसष्ठ कला आहेत त्या शिकवते आणि परा विद्या मनःशांती देते, आत्मज्ञान, सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच ब्रम्हज्ञान देते." स्वामीजींच्या अमृतवाणीतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने भक्तगणांचे कान तृप्त अन् मन प्रसन्न झाले. यावेळी त्यांनी जीवन जगण्यासाठीचे अनमोल विचार व्यक्त केले.

तत्पूर्वी सकाळी ५.०० वाजेपासून श्री. काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्रात काकड आरती, सकाळचे, दुपारचे सांप्रदायिक भजन आदी कार्यक्रम सुरू होते. सायंकाळी ५.०० वाजता श्री.सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे दिंडीच्या गजरात कार्यक्रम स्थळी आगमन झाले. यावेळी मठाचे अध्यक्ष श्री परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ, मंगेश राऊळ आदी भक्तगणांनी स्वामींचे स्वागत केले. सौभाग्यवतींनी ओंक्षण केले तर सतीश राऊळ दांपत्याने पाद्यपूजा पूजा केली. तद्नंतर मठात श्री.सिद्धरामेश्वरांची आरती आदी विधी पार पडल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंचावरील श्री.काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. त्यानंतर कनेडी, कणकवली येथील स्वामीजींचे भक्त डॉ.पराग मुंडले यांच्या मधाळ वाणीतून आध्यात्मिक प्रवचन झाले. त्यानंतर दासबोध वाचन, सायंकाळचे, रात्रीचे भजन आदी कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रमाचे शेवटच्या सत्रात मठात येणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहासाठी मोलाचे सहकार्य करणारे माजी शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर यांचा स्वामीजींच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आम. दिपक केसरकर स्वामीजींच्या प्रवचनाच्या वेळी पूर्णवेळ मंचावर उपस्थित होते. या प्रसाधनगृहासाठी अवधूत नार्वेकर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. त्याचबरोबर आपला अमूल्य वेळ देऊन सचिव पदाची जबाबदारी पार पाडणारे श्री भगवान राऊळ आणि आर्थिक, तसेच महाप्रसादासाठी योगदान देणारे श्री.रमेश विष्णू पै यांचा देखील स्वामीजींच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वामींच्या आरती नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावंतवाडी मठातील भरत नार्वेकर, श्रीम.माधुरी कोरगावकर, सुमती कासकर, सौ.विनिता सातार्डेकर, शर्मिला मिशाळ, रेखा मिशाळ, रमा बांदेकर, रुपाली रेमुळकर, श्रीम.रविना सावंत, गणेश मिशाळ, सखाराम गावडे, मनोज वारंग, दीपक पटेकर, मळगाव येथील सुभाष राऊळ, नागेश राऊळ आदी राऊळ कुटुंबियांनी मोलाचे सहकार्य केले.