
कणकवली : गुंतवणूकी पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
पुणे येथील शंभूराजे देवकाते यांनी सावंतवाडी येथील गुंतवणूकदार सागर कारिवडेकर यांच्याकडे ४ कोटी ७५ लाख रुपये गुंतविले होते. मात्र, सदरची रक्कम मुदतीत परत न दिल्याने कारिवडेकर यांची पोर्शे ही अलिशान कार नेण्याकरीता देवकाते हे आपल्या मित्रांसह कारिवडेकर यांच्या बंगल्यावर आले असता त्यांचे स्वीय सहाय्यक वामन उर्फ नितीन मेस्त्री यांनी त्यांना जिवे ठार मारण्याकरीता स्थानिक असलेल्या तहा राजगुरू, अब्दुल खान, तेहसिल दरवाजकर, तल्हा राजगुरू यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या अंगावर गाड्या घालून तसेच त्यांना लोखंडी गज व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच देवकातें यांची यांच्या फॉरच्युनर गाडीची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. १०९ (१), १८९ (२), १८९ (४), १२५ अव ब ३२४ (४), ३५२. ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपी वामन उर्फ नितीन मेस्त्री याला अटक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर मुक्तता करतानाच अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात ढवळाढवळ करू नये अशा अटी घातल्या आहेत.










