
मालवण : मालवण नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत एक वर्षाहून अधिक काळ पथदीपाविना अंधारात असलेल्या मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडीतील जी-१० पासून पुढील ७ विजेच्या खांबावरील स्ट्रीटलाईट मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नाने अखेर सुरू झाल्याने या मार्गांवर असलेले अंधाराचे साम्राज्य दूर झाले आहे. नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून झाडीझुडपे साफ करून घेत हा रस्ता प्रकाशमान केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडीतील या मुख्य रस्त्यावरील पथदीप गेल्या वर्षभरापासून बंद होते. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना येण्या-जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे याची मागणी केली होती, परंतु प्रशासकीय राजवटीच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते.
निवडून आल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने कार्यवाही केली. विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा ठरलेली झाडे आणि झाडी स्वतः उभे राहून साफ करून घेतली. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर या भागातील ७ पथदीप पुन्हा एकदा उजळले आहेत. या निमित्ताने बोलताना नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे. रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले.










