वझरे येथे बेकायदा खनिजयुक्त माती साठवणुकीचा आरोप

ग्रामस्थांनी काम पाडले बंद
Edited by: लवू परब
Published on: January 28, 2026 19:39 PM
views 110  views

दोडामार्ग : तालुक्यातील वझरे येथील एका खासगी जमिनीत बेकायदा खनिजयुक्त मातीची साठवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर जमिनीस अकृषिक सनद नसताना दुसऱ्या ठिकाणाहून माती आणून टाकली जात असून, रात्रीच्या वेळी चोरीछुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. गावात असा कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी घटनास्थळी धडक देत ते काम बुधवारी बंद पाडले. तालुक्यातील वझरे येथील एमएनजीएल पंपासमोर असलेल्या एका खासगी जमिनीत काही दिवसांपासून मायनिंगयुक्त मातीचा साठा केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी साठवण्यात आलेली माती खनिजसदृश्य असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही माती रात्रीच्या अंधारात चोरीछुप्या पद्धतीने इतरत्र नेली जात असल्याने हा प्रकार बेकायदा मायनिंगशी संबंधित असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच सदर जमिनीत जाण्यासाठी शासनाच्या जमिनीवरून बेकायदेशीर रस्ता तयार केल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.

रात्रीच्या वेळी चोरीछुपी वाहतूक

या ठिकाणी साठवणूक करण्यात आलेली माती ही खनिजसदृश्य असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगड आहेत. ही माती रात्रीच्या वेळी चोरीछुप्या पद्धतीने इतरत्र नेली जात असून हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर मायनिंगशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा जमीनमालकांचा दावा

ग्रामस्थ आक्रमक झाल्याने  जमिनीचे मालक घटनास्थळी आले असता ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला. मात्र आमच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे असून आम्ही कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा दावा जमीनमालकांनी केला. 

कायदेशीर असले तरी गावात असे व्यवसाय नकोत

दरम्यान मुख्य रस्त्यावरून प्रवेश केला जात असून हा रस्ता मंजूर प्लॅनमध्ये नसल्याचे त्यांनी मान्य केल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कायदेशीर असले तरी गावात असे व्यवसाय नकोत, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीची एनओसीही दिली असेल तर ती रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतीला भाग पाडणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

यावेळी वझरे–गिरोडेचे माजी सरपंच विष्णू उर्फ सागर नाईक, लक्ष्मण गवस, चंद्रकांत नाईक, समीर पर्येकर, विकास गावडे, बाळा उर्फ बंटी शिरोडकर, शिवम गवस, तुषार गवस, अजय गवस, श्रीपाद गवस, अर्जुन गवस, अक्षय गावडे, कृष्णा म्हावसकर, संजय गवस, नारायण गवस, साईप्रसाद घाडी, शिवा गवस, आशिष हरवाळकर, कृष्णा काळकेकर, अविनाश काळकेकर, शुभम काळकेकर, नकुल काळकेकर, उल्हास पर्येकर, अभिषेक खोत, विष्णू पर्येकर, लक्ष्मण शिंगाडी, अविनाश म्हाळसेकर, संदेश म्हाळसेकर, योगेश खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.