जिल्ह्यातल्या कॉयर उद्योगाच्या उपक्रमांची केंद्र सरकारकडून

Edited by: विनायाक गांवस
Published on: January 25, 2026 19:20 PM
views 26  views

सावंतवाडी : दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपक्रमांची दखल घेत केंद्र सरकारकडून हा सन्मान देण्यात आला आहे.

या सोहळ्यात जिल्ह्यातून श्रुती रेडकर, सुजाता देसाई, संदीप देसाई, गीता गावडे, अनिल गावडे, रिया चव्हाण, रविंद्र चव्हाण, रुची राऊळ, राजाराम राऊळ यांच्यासह जिल्हा जनसंपर्क अधिकारी तथा कॉयर अधिकारी श्रीनिवास बिटलिंगू आणि पत्रकार सचिन रेडकर यांचा विशेष सहभाग राहणार आहे. उद्योजकांनी कॉयर उत्पादन, प्रक्रिया व विक्री या क्षेत्रात अनेक महिलांना आणि स्थानिक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागात स्वयंपूर्णतेचा आदर्श उभा करत आर्थिक सक्षमतेकडे नेणारे हे प्रयत्न प्रेरणादायी ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर क्षेत्राला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही ओळख जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून भविष्यात या उद्योगाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कॉयर क्षेत्रात कार्यरत असलेल्या व विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लघु उद्योजकांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय एमएसएमई मंत्री 

जीतन राम मांझी यांच्या हस्ते व एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांच्या विशेष उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील समर्थ कॉयर इंडस्ट्रीच्या उद्योजिका श्रुती सचिन रेडकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. श्रुती रेडकर यांनी महाराष्ट्र राज्याच्यावतीने कॉयर क्षेत्रातील वाटचाल विषद केली. यावेळी कॉयर बोर्डचे चेअरमन विपुल गोयल, सह संचालक डॉ. षणमुगासुंदरम, जनसंपर्क अधिकारी तंकचन, विकास अधिकारी ( इंडस्ट्रीज ) सुरेश कुमार, प्रादेशिक कार्यालय प्रमुख श्रीनावास बिटलिंगू आदी उपस्थित होते.