
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी एसटी व कारचा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे पासिंगची कार गोव्याकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जात होती. ओसरगाव येथे आल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार वेगाने डिव्हायडरवर चढून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आली. त्याच वेळी समोरून एसटी येत होती. अचानक समोर आलेल्या कारला वाचवण्यासाठी बस चालकाने सतर्कता दाखवत बस तातडीने बाजूला घेत डिव्हायडरवर चढवली. बस चालकाच्या या धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातामध्ये एसटीच्या डाव्या बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण धडकेत कारच्या समोरील आणि मागील भागाचा चक्काचूर झाला आहे. कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदतकार्य केले.










