मधुर समन्वय मधुमक्षिका पालन प्रकल्पाच्या नियामक मंडळावर डॉ. अजित दिघे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 25, 2026 19:31 PM
views 20  views

वैभववाडी : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मधुर समन्वय – मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रकल्पा’च्या नियामक मंडळावर आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अजित दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरली आहे. डॉ. अजित दिघे हे गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

करिअर कट्टा विभागाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि करिअर कट्टा विभाग यांच्यात ‘मधुर समन्वय – मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रकल्पा’साठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमातून राज्यात मधुर क्रांतीची सुरुवात झाली आहे.या उपक्रमाअंतर्गत राज्यातील लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण मिळणार असून, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या गुणवत्ता, अंमलबजावणी व नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळावर डॉ. अजित दिघे यांची (सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक) नियुक्ती करण्यात आली आहे.हा सामंजस्य करार नुकताच पार पडला. यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.डॉ. दिघे यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.