
सावंतवाडी : देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील सुपुत्र आणि 'आपदा मित्र' प्रथमेश गावडे यांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रथमेश गावडे यांनी 'आपदा मित्र' म्हणून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या अत्यंत धाडसी आणि उत्कृष्ट कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांना नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड प्रत्यक्ष अनुभवण्याचा दुर्मिळ बहुमान मिळाला आहे. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे प्रथमेश गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशासाठी योगदान देणाऱ्या निवडक व्यक्तींमध्ये स्थान मिळवून प्रथमेश गावडे यांनी आपल्या भागाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. आपत्तीच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करणाऱ्या आपदा मित्राचा हा सन्मान, राज्यातील हजारो स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत. आंबोलीच्या प्रथमेश गावडे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.










