राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य

भव्य शपथ ग्रहण सोहळा
Edited by: विनायाक गांवस
Published on: January 24, 2026 11:14 AM
views 30  views

सावंतवाडी : भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, आगामी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज २३ जानेवारी रोजी सावंतवाडी उपविभागीय कार्यालय व तहसीलदार कार्यालयात भव्य शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला. २५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने आयोगाच्या सूचनेनुसार आजच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘मी भारत आहे’ थीमने वेधले लक्ष

यावर्षीच्या मतदार दिनासाठी माझा भारत, माझं मत, मी भारत आहे. ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेची माहिती सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली २७०-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील, श्री. मुसळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी समीर घारे यांनी आवाहन केले की, "भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. विशेषतः नवमतदारांनी नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि भारतीय लोकशाही अधिक मजबूत करावी. यावेळी "लोकशाहीचा आधार आमचे मतदान" आणि "मी मतदान करणार, तुम्ही मतदान करा" अशा घोषणांनी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत आज हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, महाविद्यालये, शाळा आणि मतदान केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मतदार शपथ घेतली.