
कुडाळ : जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत आता एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिंदे सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले रुपेश पावसकर यांनी आपली बंडखोरी कायम ठेवत नेरूर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. पावसकर यांच्या या पावलामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
गावाचा पाठिंबा हाच माझा आधार
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपेश पावसकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. " माझ्या गावच्या जनतेने आणि समर्थकांनी मला उभे केले आहे. गावाचा विकास हाच माझा मुख्य अजेंडा आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे, पक्षादेश डावलून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे भाजपच्या याकडे कसे पाहणार हे महत्त्वाचे आहे.
'उबाठा'ची छुपी साथ? राजकीय चर्चांना उधाण
पत्रकार परिषदेत पावसकर यांनी एक सूचक विधान केले. ते म्हणाले, "गावाच्या विकासासाठी जो पक्ष माझ्यासोबत येईल, त्याला घेऊन मी पुढे जाणार आहे." त्यांच्या या विधानानंतर नाव न घेता त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या समर्थनाचे संकेत दिले आहेत. जर 'उबाठा' गटाने पावसकर यांना छुप्या पद्धतीने मदत पुरवली, तर या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन प्रस्थापितांना मोठा फटका बसू शकतो.
तिसरे पॅनल सक्रिय होणार?
रुपेश पावसकर यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात आता 'तिसरे पॅनल' सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेरूरमधील या बंडखोरीचा परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघांवरही होण्याची चिन्हं आहेत. आता या बंडखोरीवर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि निवडणुकीच्या रिंगणात 'नेरूर'चा गड कोण सर करतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










