
सावंतवाडी : ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सावंतवाडीत पुन्हा एकदा आंतरराज्यीय "मालवणी करंडक एकांकीका स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत येथील पालिकेच्या जनरल जगन्नाथराव उद्यानासमोर हा करंडक रंगणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. रुजूल पाटणकर यांनी दिली. दरम्यान, या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात योगदान देणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे, असे श्री. पाटणकर यांनी सांगितले.
येथील पालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, निरंजन सावंत, आनंद काष्टे, सचिन मोरजकर, श्रेयस मुंज, भुवन नाईक, निखिल माळकर, नितेश देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटणकर पुढे म्हणाले, या ठिकाणी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून १० वर्षापुर्वी सावंतवाडीत मालवणी करंडक घेण्यात आला होता. कलाकांराना व्यासपीठ मिळावे हा त्या मागचा उद्देश्य होता. आता हा करंडक पुन्हा एकदा त्याच ताकदीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या संघाला अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार, अशी पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे तर उत्कृष्ठ दिग्दर्शन, नेपथ्य आणि बाल कलाकार अशी विविष पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त संघानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. पाटणकर यांनी केले. श्री. टेंबकर म्हणाले, मालवणी करंडक महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतू, दरम्यानच्या काळात त्यात खंड पडला होता. मात्र, आता हा महोत्सव त्याच ताकदीने पुन्हा एकदा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी विविध क्षेत्रात आपले जीवन समर्पित करणार्या कलाकारांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. यावेेळी श्री. सावंत म्हणाले, या कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी ओंकार कलामंच गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. आता पुन्हा एकदा आम्ही मालवणी करंडकच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे जास्तीत-जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले. अधिक माहितीसाठी सचिन मोरजकर 9421111616 किंवा भुवन नाईक 9607293588 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे.










