
कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ ची रणधुमाळी आता निर्णायक वळणावर आली आहे. पंचायत समिती गण ५१ आवळेगाव मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, अपक्ष उमेदवार विराणी विष्णू तेरसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता आवळेगाव गणात निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मैदानात आता 'हे' उमेदवार
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता आवळेगाव गणात मुख्य लढत खालील उमेदवारांमध्ये होणार आहे:
१. श्रावणी घनश्याम तेरसे – (भारतीय जनता पक्ष)
२. योगिता नंदकिशोर पवार – (शिवसेना - उबाठा)
३. कुमुदिनी शिवराम सार्वत – (अपक्ष)
भाजपा विरुद्ध शिवसेना (उबाठा) असा थेट सामना
विराणी तेरसे यांनी माघार घेतल्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रावणी तेरसे यांची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. मात्र, शिवसेना (उबाठा) गटाच्या योगिता पवार यांनीही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्याचबरोबर कुमुदिनी सार्वत या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने त्या कोणाची मते खेचतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.










