२६ जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडीत बैठक | प्रशासनास दोन दिवसांची मुदत
Edited by: विनायाक गांवस
Published on: January 23, 2026 13:25 PM
views 28  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्या संदर्भात शनिवार 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 26 जानेवारीला नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल असा इशारा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने दिला. कृती समितीच्या शिष्टमंडळास रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी 22 जानेवारीला सायंकाळी चर्चेस निमंत्रीत केले होते. वैद्यकीय अधिक्षक रजेवर असल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीषकुमार चौगुले यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. कागदावर सावंतवाडीत उप जिल्हा रुग्णालयात 34 डॉक्टर आहेत. प्रत्यक्षात कित्येक पदे रिक्त आहेत. अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिका प्रकरणी सर्कीट बेंच कोल्हापूर यांनी पाहणीसाठी समिती गठीत केली. त्या समितीने पाहणी केली, अहवाल दिला. मात्र, तब्बल तीन ते चार महिने झाले तरी समितीच्या अहवालावर कार्यवाही दिसून येत नाही. स्वतः आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी पाहणी करुन वरच्या मजल्या वरील एका खोलीत जिथे भंगार सामान भरले आहे. ती खोली रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपसंचालकांच्या सूचनांचेही पालन झालेले नाही. ही खोली रिकामी करुन त्या ठिकाणी 20 रुग्णांचा एक वाँर्ड होऊ शकेल, अशा उपसंचालक यांच्या सूचना होत्या. मात्र ते सुद्धा केलेले नाही. 

एम. डी. फिजिशियन उपलब्ध करुन द्यावेत, दोन भुलतज्ञ कायम स्वरूपी मिळालेत. रक्तपेढीची स्टोअरेज क्षमता 400रक्त बँग करावी, ट्रामा केअर युनिट कार्यरत करावेत, रेडिओलाँजिस्ट उपलब्ध करुन द्यावेत. रुग्णालयातील लिफ्ट सुरु करावी, कंत्राटी कर्मचारी यांची सही प्रत्यक्ष ज्या पगारावर घेतली जाते. तेच वेतन त्यांना अदा करावे आदी मागण्या शिष्टमंडळाने ठेवल्या. यावेळी झालेल्या चर्चेत एन.बी.रेडकर, कृती समितीचे रविंद्र ओगले, राजू केळुसकर, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर, माडखोल माजी सरपंच संजय लाड, रुग्ण कल्याण समिती सदस्य रवी जाधव, सामाजिक बांधिलकी च्या रुपा मुद्राळे, भाऊ पाटील, अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर,संगीत कलाकार चंद्रकांत घाटे, आर.एम.शिंदे, ए.के. गायकवाड आदी उपस्थित होते. 2013 पासून जनहित याचिका दाखल आहे. मात्र, शासन ठोस उपाययोजना करत नाही. रक्तपेढीला आकृती बंधानुसार पदे मंजूर नाही. समितीने शिफारशी करुन सुध्दा कार्यवाही नाही. यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उपसंचालक डॉ. माने यांची कृती समितीने भेट घेतले. त्यावेळी काही तोंडी आश्वासने मिळाली आहेत. त्या आश्वासनांसदर्भात लिखित उत्तर मिळावे, अशी मागणी कृती समितीने केली. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मोबाईल वर डॉ. चौगुले यांचे माफँत शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या दोन दिवसात वरच्या मजल्या वरील वाँड सुरु करणे, काही तज्ञ डॉक्टरांना नियुक्ती देणेसंबधी निर्णय व्हावेत. यासंदर्भात लेखी पत्र दोन दिवसात शनिवार पर्यंत द्यावे. वरच्या मजल्यावरील वाँर्ड सुरु करावा या गोष्टी झाल्या तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाईलाजाने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालया समोर 26 जानेवारीला उपोषणास बसावे लागेल असा इशारा कृती समितीने दिला.