
कणकवली : कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आज वरवडे पंचायत समितीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले सोनू सावंत यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने आज कणकवली तालुक्यातील भाजपाचा दुसरा पंचायत समिती मधील उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध झाले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक विभागाकडून करण्यात आली नसली तरी वरवडे पंचायत समितीमध्ये तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये यांनी अर्ज माघार घेतल्याने आता एकमेव सोनू सावंत यांचा अर्ज राहीला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर होणार आहे. भाजपाचा हा ठाकरे गटाला दुसरा धक्का कणकवली तालुक्यातून देण्यात आला आहे. आतापर्यंत भाजपाचे कणकवली मतदारसंघांमध्ये तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यामध्ये बिडवाडी पंचायत समिती, दुसरी वरवडे पंचायत समिती तर वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समितीची जागा भाजपला बिनविरोध झाल्या आहेत.










