पाय घसरून महिलेचा मृत्यू

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2026 19:50 PM
views 38  views

सावंतवाडी : टेरेसवर कपडे सुकत घालण्यासाठी गेली असताना फरशीवरून पाय घसरून पडल्याने एका ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावंतवाडी येथील रेडकर कंपाऊंड, बाहेरचा वाडा येथे घडली आहे. तबसुम आरिफ शेख (वय ५२) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तबसुम शेख या आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुमजली घराच्या टेरेसवर कपडे सुकत घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी टेरेसवरील फरशीवरून त्यांचा पाय अचानक घसरला आणि त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

उपचारापूर्वीच मृत्यू घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी शफीक आदमसाब खान (वय ४९, रा. भटवाडी, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांच्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.