दोडामार्गात एवढे उमेदवारी अर्ज गेले विक्रीस

Edited by: लवू परब
Published on: January 16, 2026 19:44 PM
views 19  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून ग्रामीण राजकारणात चुरशीला सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशक पत्र दाखल केले नाही. मात्र १० उमेदवारी अर्ज विक्रीस गेल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली. 

१६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची संधी उपलब्ध असून निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले नसले, तरी निवडणुकीच्या तयारीची चाहूल स्पष्टपणे लागली आहे. पहिल्या दिवशी तब्बल १० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याने अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जात प्रमाणपत्राचा १५-अ अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दिली आहे. या निर्णयामुळे उमेदवारांची गैरसोय टळणार असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करता येणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आता केवळ ५ दिवस शिल्लक असून, आगामी दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत उमेदवारांची गर्दी  वाढण्याची शक्यता अधिक आहे.