
सावंतवाडी : मुलाला मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून नातेवाईकांनीच कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चौकुळ-केगदवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस चौकीत एका महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाळासाहेब पवार (वय ३४, मूळ रा. खेड, सध्या रा. चौकुळ) यांचा मुलगा रुद्र याला त्यांचे चुलत सासरे नवनाथ जाधव यांनी मारहाण केली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी बाळासाहेब पवार हे गेले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी विशाल पवार याने हातात कोयता घेऊन बाळासाहेब यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवत असताना कोयता त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर लागून ते गंभीर जखमी झाले. तसेच किरण जाधव याने त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खालील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात परिघा एकनाथ पवार (वय ४५), विशाल एकनाथ पवार (वय २३), छायाबाई नवनाथ जाधव (वय ४५) किरण नवनाथ जाधव (वय २२) (सर्व रा. खेड, सध्या रा. चौकुळ-केगदवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गलोले करत आहेत.










