
सावंतवाडी : सालईवाडा येथे असलेल्या नगरपालिकेच्या ''हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या''चा स्लॅब कोसळले आहे. याबाबतची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक प्रतिक बांदेकर आणि निलम नाईक यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत पाहणी केली. दवाखाना सुरू असलेली इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी येणार्या रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेता तो दवाखाना तात्काळ अन्यत्र हलविण्यात यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
येथील मिलाग्रीस चर्चसमोर असलेल्या जुन्या मुख्याधिकारी निवासस्थानात हा दवाखाना सुरू आहे. त्याठीकाणी दिवसाला ५० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. त्या ठीकाणी चांगली सेवा मिळत असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. मात्र, इमारत जीर्ण झाल्याने जनरल वॉर्डचा स्लॅबचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने त्या ठीकाणी कोणीही नसल्यामुळे जिवीनहानी झाली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक प्रतिक बांदेकर आणि निलम नाईक या दोघांनी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी संदिप सरडे आणि मनोज राउळ यांना घेवून त्या पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष सांगावकर यांच्याशी चर्चा केली. रुग्णांची सुरक्षीतता लक्षात घेता तो दवाखाना सुरक्षीत जागेत तात्काळ हलविण्यात यावा त्यासाठी रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी जेष्ठ नागरिक केंद्राच्या इमारतीचा विचार व्हावा अशा सुचना अधिकार्यांना दिल्या.










