लोगो असो वा पद..नियम मोडला तर कारवाई ठरलेली !

जिल्हा परिषदेत बेशिस्त पार्किंगवर CEO रवींद्र खेबूडकर यांची थेट धडक कारवाई | आमदार लोगो असलेल्या इनोव्हा गाडीची हवा काढून दिला कडक संदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 15, 2026 20:31 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यावेळी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता थेट कारवाई करत शिस्तीचा ठाम संदेश दिला आहे. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोर्च झोनमध्ये आमदार लोगो लावलेली इनोव्हा गाडी नियमबाह्य पद्धतीने उभी करण्यात आली होती. याच मार्गावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शासकीय गाडी कार्यालयासमोर येत असताना संबंधित इनोव्हा गाडी अडथळा ठरली. परिणामी CEO यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती.

विशेष म्हणजे, संबंधित इनोव्हा गाडीत चालक उपस्थित असतानाही त्याने गाडी बाजूला घेण्याची कोणतीही हालचाल केली नाही. सर्व परिस्थिती स्पष्ट दिसत असतानाही चालक निष्क्रिय राहिल्याने अखेर CEO खेबूडकर साहेब स्वतः गाडीतून उतरले आणि कोणतीही तडजोड न करता त्या गाडीची हवा काढून चावी ताब्यात घेतली. या घटनेमुळे जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. “कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

जिल्हा परिषद कार्यालयातील वाहनतळाचा प्रश्न हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. खाजगी व शासकीय वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने बेशिस्त पार्किंगच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशस्त वाहनतळ उपलब्ध करणे तसेच खाजगी व शासकीय वाहनतळ स्वतंत्र करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांच्या या थेट कारवाईमुळे नियम सर्वांसाठी समान आहेत हा स्पष्ट संदेश गेला असून, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. याचबरोबर जिल्हा परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी व वाहनचालकांनी जबाबदारीने, शिस्तीने वागावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीदही CEO खेबूडकर यांनी दिली आहे.