भोसले फार्मसी कॉलेजमध्ये उद्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

मुंबई - पुणे विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग, ३० हजारांची पारितोषिके
Edited by: विनायाक गांवस
Published on: January 15, 2026 19:28 PM
views 15  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे उद्या १६ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या प्रायोजकत्वाखाली राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डी.फार्मसी अभ्यासक्रमाशी संबंधित बहुपर्यायी व विश्लेषणात्मक प्रश्नांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत मुंबई व पुणे विभागातील विविध फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांचे विषयज्ञान वाढवणे, तर्कशक्ती विकसित करणे व स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना एकूण ३० हजार रुपयांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ.विजय जगताप, समन्वयक प्रा.सत्यजित साठे, प्रा.स्नेहा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.