
सावंतवाडी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या न्हावेली माऊली मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून देखभाल - दुरुस्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कंत्राटदाराकडून हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करून घ्यावा. त्यानंतरच रस्ता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी न्हावेली उपसरपंच तथा शिंदे सेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
उपसरपंच पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, न्हावेली मुख्य रस्ता ते माऊली मंदिर कडे जाणार्या जोड रस्ता या कामाची पाच वर्षांची देखभाल-दुरुस्तीची मुदत ३१ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यानंतर सदरचा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग होणार आहे परंतु सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गटारांची कामेही प्रलंबित आहेत. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुदत संपायला केवळ काही महिने शिल्लक असताना कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केला आहे. कंत्राटदाराकडून रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच गटारांची अर्धवट राहीलेली कामे पूर्ण करून घेऊनच रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत साटेलकर, ओम पार्सेकर, राज धवण, अमोल पार्सेकर, अनिकेत धवण, भावेश पार्सेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.












