ग्रा. पं. चं गेट परस्पर विकल्याचा आरोप

सरपंचांसह भंगारवाल्याची चौकशीची मागणी ; महेश जुवाटकरांनी वेधलं लक्ष
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 10, 2026 15:44 PM
views 218  views

मालवण : गोळवण-कूमामे- डिकवल, ता. मालवण या ग्रामपंचायतीच्या कुंपणाला मोठा गेट होता तो गेट रस्ता डांबरीकरण करताना ठेकेदाराने बाजूला काढून ठेवला होता परंतु रस्ता डांबरीकरण होवून सुद्धा बरेच महिने उलटून गेले असताना तत्कालीन सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांनी भंगार घेणारे समद किताबुल्ला चौधरी सध्या वास्तव्य नाशिक याला रू. ३०,०००/- एवढया रकमेस परस्पर विकला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व समद किताबुल्ला चौधरी व सुभाष दत्ताराम लाड या दोन्ही व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी मालवण पोलिसांकडे केली आहे. 


जुवाटकर यांनी म्हटले आहे, या गेट संदर्भात मी अनेक वेळा पोलिस स्टेशन मालवण यांना विचारणा केली असता गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत तात्कालीन सरपंच यांनी मालवण पोलिस स्टेशनला एन.सी. केली होती. ती एन. सी. कट्टा सब पोलिस स्टेशनला (ठाणे अंमलदार) वर्ग करण्यात आली. परंतु आज मिती पर्यंत गेट चोरीसंदर्भात कोणत्याही प्रकारचा अहवाल कट्टा सब पोलिस स्टेशनने मालवण पोलिस स्टेशनला सादर केलेला नाही. परंतु मी बरेच दिवस बारकाईने चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, ग्रामपंचायतीचा गेट रस्ता डांबरीकरण करतेवेळी लगतच्या कुंपणाला लावून ठेवला होता. सदरचा नवीन गेट तात्कालीन सरपंच यांनी स्वतः कोणतीही लिलाव पद्धत न करता ग्रामपंचायतीच्या आवारातील गेट परस्पर समद किताबुल्ला चौधरी (भंगारवाला) याला रू. ३०,०००/- एवढ्या रकमेस विकला असे भंगार विक्रेत्यांकडून समजले. समद किताबुल्ला चौधरी (भंगारवाला) याची आपल्या खात्याकडून सखोल चौकशी होईल म्हणून तात्कालिन सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांनी भंगारवाल्याला पळून जाण्यास सहकार्य केले.


त्यामुळे समद किताबुल्ला चौधरी (भंगारवाला) ही व्यक्ती बांग्लादेशीय असतानासुद्धा तात्कालिन सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांनी ग्रामपंचायतीचा बनावट घरपत्रक उतारा तयार करून परस्पर भंगारवाल्याला दिल्यामुळे भंगारवाल्याने भारताचे नागरिकत्व असल्याचे भासविण्यासाठी शासकीय सर्व ओळखपत्रे (आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, पासबुक व इतर कागदपत्रे) तयार केली व काही योजनांचा लाभ घेण्यास सुरूवात केली असता आमच्या निदर्शनास आले म्हणून संबंधीत कार्यालयाला पत्रव्यवहार केला. सदर प्रकरणी खोट्या कागदपत्रांचा वापर एक बांग्लादेशीय करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे दि. ०६/०१/२०२६ रोजी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या कार्यालयाने तात्कालीन सरंपच  सुभाष दत्ताराम लाड यांना सरपंच पदावरून व सदस्य पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तरी वरील गेट विक्री संदर्भात आपल्या कार्यालयाकडून सखोल चौकशी व्हावी व समद किताबुल्ला चौधरी व सुभाष दत्ताराम लाड या दोन्ही व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.