'वीरगाथा ५.०' उपक्रमात सिंधुदुर्गचा ठसा

Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2026 16:41 PM
views 18  views

सावंतवाडी : देशाच्या वीर जवानांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या 'वीरगाथा ५.०' या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत संपूर्ण देशातून निवडण्यात आलेल्या १०० विजेत्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावी वैभव मुद्राळे आणि बांदा कास येथील शमिका सदू गवंडी या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबवण्यात आलेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातून एकूण १९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यामध्ये सिंधुदुर्गच्या या दोन चमकणाऱ्या ताऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचा मान वाढवणारे विजेते सावी वैभव मुद्राळे: कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे व शमिका सदू गवंडी: जिल्हा परिषद शाळा, कास नं. १, सावंतवाडी. यांचा समावेश आहे.


'वीरगाथा' हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शौर्यगाथांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे आयोजित केला जातो. राष्ट्रीय स्तरावरील या कठीण स्पर्धेतून निवड होणे ही केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. या निवडीमुळे या दोन्ही विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. "राष्ट्रीय स्तरावरील ही निवड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे." असं मत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले आहे.या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षक, पालक आणि शिक्षण प्रेमींकडून सावी आणि शमिका यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.