
सिंधुदुर्गनगरी : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस–सावंतवाडा दरम्यान आज एक थरारक अपघात घडला. कोल्हापूरहून कुडाळच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. महामार्गावरील संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिल्यानंतर वाहन थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन पलटी झाले. अपघाताचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. मात्र या भीषण अपघातात चालकाला सुदैवाने केवळ किरकोळ जखमा झाल्या. महामार्ग वाहतूक पोलिसांनी चालकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार सागर परब, पांडुरंग खडपकर आणि निलेश सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढताना पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धैर्य खरोखरच कौतुकास्पद होते.
ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली आणि एका कुटुंबाचा आधार वाचला, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पलटी झालेले वाहन बाजूला काढले आणि वाहतूक सुरळीत केली. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित झाले असून वाहनचालकांनी वेगमर्यादा व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.










