
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आज तिसऱ्या दिवशी देवगड शाखेच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. शिक्षकांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली. या आंदोलनाला राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर यांनी भेट देत मार्गदर्शन केले. यावेळी देवगड शाखेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण, सचिव गुंडू नेऊंगरे यांच्यासह नंदकुमार राणे, जगदीश गोगटे, संदीप मिराशी, सचिन धुरी उपस्थित होते. तसेच पतपेढी संचालक संतोष राणे, सचिन बेर्डे यांच्यासह महिला शिक्षिका अदिती राणे, कावेरी बंडगर, स्मिता राणे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. प्रदीप मराठे, जगदीश शिंदे यांचीही उपस्थिती होती.
शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिक्षकांच्या एकजुटीचे दर्शन घडवत हे आंदोलन पुढील काळातही सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.










