
सावंतवाडी : भटवाडी येथील श्रीमती. सविता धारणकर यांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. त्यांचा हा त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण केला आहे. श्रीमती. धारणकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने काल राहत्या घरी निधन झाले. आपल्या मृत्यूनंतर अंधांना दृष्टी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र रघुनाथ धारणकर आणि नातू भार्गव धारणकर यांनी तत्काळ पाऊले उचलली. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले आणि नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हे नेत्र पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आलेत. आपल्या आजीचा हा उदात्त संकल्प पूर्ण करण्यासाठी नातू भार्गव धारणकर यांनी विशेष मेहनत घेतली. या अनोख्या दानाबद्दल भटवाडी आणि सावंतवाडी परिसरातून धारणकर कुटुंबाचे कौतुक होत आहे. अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश यावा ही माझ्या आजीची तळमळ होती. तिचा आदर्श घेऊन समाजातल्या इतर लोकांनीही नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी धारणकर यांनी केले आहे.










