
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या डंपीग ग्राउंडसह कारिवडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा केला. कचरा डेपोवरील अस्वच्छतेला प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात किमान २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
ते म्हणाले, आम्ही सूत्रे हातात घेतल्यानंतर कचरा डेपोवर आलोत, गार्डनमध्ये नाही " असा जोरदार टोला त्यांनी सत्ताधारी भाजपला लगावला. सावंतवाडी शहर कचरामुक्त व दुर्गंधीमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत पुढील ५० वर्षांचे नियोजन म्हणून कचरा विघटन प्रकल्पासाठी २५ एकर जागेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. यासाठी एखाद्या गावात २५ एकर जागा खरेदी करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार असून ते निश्चितच मागणी पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच या विषयावर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पॉट पंचनाम्यादरम्यान कचरा डेपोवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व इतर आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही श्री. परब यांनी निदर्शनास आणले. यावेळी आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून त्यांनाही जाब विचारला. गेल्या महिनाभरापासून कचरा विघटन करणारे यंत्र बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे समोर आले असून यावर तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेने वेंगुर्ला नगरपालिकेप्रमाणे स्वच्छतेबाबत प्रभावी काम करावे, असे सांगत या सर्व परिस्थितीसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासमवेत नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.










