सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी उमाकांत वारंग

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2025 16:12 PM
views 42  views

सावंतवाडी : येथील सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी तालुका - सावंतवाडी, जिल्हा - सिंधुदुर्ग या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता मुख्य निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी संस्था कार्यालय सावंतवाडी या ठिकाणी उपाध्यक्ष पदाच्या निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपस्थित सर्व संचालकांनी उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य व संचालक उमाकांत सदाशिव वारंग यांची एकमताने उपाध्यक्षपदी निवड केली. 

उपाध्यक्ष पदी निवड झालेले उमाकांत वारंग हे सामाजिक, सहकार, शैक्षणिक, क्रीडा अधिक क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान देत आहेत. तसेच पतपेढीच्या उभारणीमध्ये आणि प्रगतीमध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. पतपेढी उपाध्यक्ष पदाच्या निवडकरिता त्यांचा एकमेव अर्ज आल्याने व माघार न घेतल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कदम यांनी जाहीर केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक दत्ताराम सावंत, श्रीमती सीमा मठकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर, श्रीमती किशोरी कुडतरकर, श्रीमती मनीषा मिशाळ, देवेंद्र तुळसकर, चंद्रकांत शिरोडकर, शरद सावंत, रमेश बोंद्रे, सदानंद जाधव, यांसह अन्य उपस्थित होते.दरम्यान, नवनिर्वाचित उपाध्यक्ष उमाकांत वारंग यांनी सर्व संचालक मंडळाचे व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आभार मानत आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू तसेच संस्थेच्या पतपेढीच्या नियमानुसार कारभार चालवून पतपेढीचा आर्थिक उत्कर्ष कसा वाढेल, याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ, अशी ग्वाही देत सर्वांचेच आभार मानले.नवनिर्वाचित उपाध्यक्ष उमाकांत वारंग यांचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक संजू परब तसेच पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे यांसह सामाजिक, सहकार, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.