भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट्स - गाईड शिबिर उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2025 17:53 PM
views 19  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज फडकावून करण्यात आली.  यावेळी शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित होत्या.पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी क्रियात्मक गाणी, हस्तकला, कचऱ्यापासून वस्तू तयार करणे, रांगोळी, सजावटीच्या वस्तू, ट्रेझर हंट तसेच फ्लेमलेस कुकिंग यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संध्याकाळी कॅम्पफायरचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कॅम्पफायरभोवती गाणी गायली व स्काऊट्स-गाईड्सवर आधारित नाट्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यायाम, कॅम्पस स्वच्छता व सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर तंबू सजावट, तात्पुरते तंबू उभारणी, कॅम्पक्राफ्ट, गाठी बांधणे, शिट्टीचा उपयोग व चिन्हांची ओळख यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. स्पर्धांचे निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थ्यांनी शिस्त, जीवन कौशल्ये, सेवा वृत्ती व सहकार्याचे महत्त्व आत्मसात केले.