सावंतवाडीकरांचा 'इयर एंड' सुनासुना !

▪️यंदा तरी 'पर्यटन महोत्सव' होणार ?
Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2025 15:10 PM
views 107  views

सावंतवाडी : २०२५ ला निरोप देताना यंदाचा सावंतवाडीकरांचा 'इयर एंड' मात्र सुनासुना जाणार आहे. वर्षाअखेरीस होणारा पर्यटन महोत्सव अथवा 'मिनी महोत्सव' सावंतवाडीकरासाठी पर्वणी ठरायचा. मात्र, २०१९ नंतर कोणत्या ना कोणत्या कारणानं हा महोत्सव झालेला नाही. नुकत्याच नगरपरिषद निवडणूक झाल्यानं यंदा वर्षाचा अखेर वेगळा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप तशा हालचाली दिसत नाहीत. महोत्सव, मिनी महोत्सवाचीही चर्चाही नाही. त्यामुळे निदान २०२६ मध्ये जानेवारी महिन्यात हा पर्यटन महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा सावंतवाडीकर व्यक्त करत आहेत. 

गेली ५ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणाने सावंतवाडीकरांना त्यांच्या जिव्हाळ्याच्या पर्यटन महोत्सवापासून वंचित राहावे लागत आहे. २०२६ च स्वागत  धुमधडाक्यात करता येईल अशी आशा सावंतवाडीकरांना होती. मात्र, महोत्सव तर दुरच 'मिनी महोत्सवाची'ही साधी चर्चा नाही.  

२००४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या व सहकारी नगरसेवकांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा सावंतवाडी पर्यटन महोत्सव शहरात भरवला गेला. पहिल्याच लोकोत्सवाला सावंतवाडीकरांनीच नव्हे, तर जिल्हावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यानंतर जिल्हाभरात अशा पर्यटन महोत्सवांचे आयोजन होऊ लागले. 'परमेश्वराला पहाटे पडलेले एक गोड स्वार' असा उल्लेख ज्या शहराचा केला जातो, त्या शहरात होणारा पर्यटन महोत्सव म्हणजे जुन्या आठवणींना मागे सारत इंग्रजी नवं वर्षाचे नव्या उमेदीने स्वागत करण्याचा जणू एक सोहळाच होता. राजेसाहेब शिवरामराजेंच्या पुतळ्याच्या साक्षीने गुलाबी थंडीत मोती तलाव काठी भरणारा हा महोत्सव म्हणजे वर्षभर पुरेल असा स्वर्गीय आनंद देणारा एक क्षण होता. यानिमित्त हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रतिभावंत कलाकार, दिग्गज मंडळीची सुंदरवाडीत असणारी रेलचेल, तलावातून निघणारी शोभायात्रा, रंगावली- चित्र प्रदर्शन, जीभेला विश्रांती न देणाऱ्या खवय्यांसह मनोरंजनाची खमंग मेजवानी म्हणजे हा महोत्सव. या महोत्सवाच्या दिवसांत नवचैतन्यच या नगरीला यायचे. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटकातील पर्यटक या काळात इथं वास्तव्यास असायचे ते हा सोहळा अनुभवण्यासाठी, या महोत्सवासाठीची तयारी, छोट्या मोठ्या उपक्रमात दडलेला दृष्टीकोन. कला, नृत्य, गायन, वादन, अभिनय, साहित्यासह सर्वांना मिळणारे व्यासपीठ अन् मिळणारी शाबासकीची थाप बळ देणारी असायची. पण, कुणाची दृष्ट याला लागली अन् गेल्या ५ वर्षांत हे सुख सावंतवाडीकरांच्या नशिबातून हिरावले गेले. २०१९ नंतर सावंतवाडीचे सुख कुठेतरी हरपल्यासारखे वाटू लागले आहे. 


दरम्यान, नुकतीच सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक पार पडली. भाजपच्या नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक तर शिवसेनेचे ७ नगरसेवक सावंतवाडीकरांनी निवडून दिले. राज्यातील महायुतीच्या विचारांचे लोकप्रतिनिधी सभागृहात बसले आहेत. त्यात पालकमंत्री नितेश राणे व माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर त्यांच्या साथीला आहेत. त्यामुळे निदान २०२६ च्या जानेवारी महिन्यात ५ वर्ष न झालेला सावंतवाडी पर्यटन महोत्सव व्हावा अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करत आहेत.