
सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त आयोजनाखाली रत्नागिरीतील डेरवण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात साक्षी उपविजेती ठरली.
साक्षीने सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. साक्षीला सन्मान चिन्ह, सिल्वर मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शखाली साक्षीने हे शिखर गाठले आहे. मागील चार वर्षे साक्षी कॅरम आणि बुदधिबळ या दोन्ही खेळात विभाग आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहे. सर्व स्तरातून साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी आपले वडील आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.










