कारवारात आढळली मृतावस्थेत महिला

कायआहे सावंतवाडी कनेक्शन..?
Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2025 12:05 PM
views 211  views

सावंतवाडी : कारवार येथील जुन्या मासळी बाजाराजवळ एक ५० वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याने कारवार शहर पोलिसांनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, या महिलेच्या मोबाईल कॉल लॉगमध्ये सावंतवाडीतील काही व्यक्तींचे मोबाईल नंबर आढळून आल्याने कारवार पोलीस सावंतवाडीत दाखल झाले होते. संबंधित व्यक्ती यापूर्वी सावंतवाडीत राहत असल्याने त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२५ रोजी ही महिला कारवार मासळी बाजार परिसरात आली होती. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी दुपारी एका नारळाच्या झाडाखाली तिचा मृतदेह आढळला. याप्रकरणी कारवार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. महिलेचे वय अंदाजे ५० वर्षे असून उंची १३९ सेंटीमीटर आहे. तिचा वर्ण गव्हाळ असून केस काळे-पांढरे आहेत. मृत्यूसमयी तिच्या अंगात भगव्या रंगाचा परकर, राखाडी रंगाचा शर्ट आणि निळा ब्लाउज होता अशी माहिती पोलिसांनी दिली असून या महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास त्यांनी कारवार शहर पोलीस ठाण्याशी (०८३८२-२२६३३३) किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक १००/११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.