कस्तुरीचं बलिदान वाया जाणार नाही : डॉ. मिलींद कुलकर्णी

कासार्डेत शोकसभा | डॉ. मयुर नागवेकरांवर कठोर कारवाईची मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 28, 2025 13:32 PM
views 107  views

कणकवली : खरतर दोनच पेशाना पेशा म्हणतात,  एक शिक्षकी पेशा आणि डॉक्टर पेशा... शिक्षक आणि डॉक्टर या दोन पेशावर जेव्हा अपवाद येतो , तेव्हा समाजात अद्पधन होते. तरी शिक्षक व डॉक्टर यानी आपला पेशा संभाळला पाहीजे. सगळेच डॉक्टर वाईट नाहीत, खुप चांगले लोक आहेत. डॉक्टर आणि आपण एकत्र राहणार आहोत. आपल्यामधील विश्वास जपला पाहीजे. आणि याला निमित्त कस्तुरी होणार असेल. तर तीचे बलिदान वाया जाणार नाही असे भावनोद्गार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काढले. 

कासार्डे तिठा येथिल कस्तुरी पाताडेच्या निधनानंतर आयोजित शोकसभेत ते बोलत होते. तत्पूर्वी कै. कस्तुरी पाताडे हीला कासार्डे व पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळेस माजी जि. प.सदस्य संजय देसाई, सुप्रिया पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी सभापती दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, संतोष कानडे, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर, संजय पाताडे, मुंबई विकास मंडळ अध्यक्ष मनोज शेलार, कस्तुरीचे वडील चंद्रकांत पाताडे, डॉ. किरण गुजर, डॉ भावना पाताडे, माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, अमोल जमदाडे, माजी पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर व कासार्डे व पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच,उपसरपंच ग्रा. पं. सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

मिलींद कुलकर्णी म्हणाले, गावचा रहिवाशी म्हणून मी या दु:खात सहभागी आहे. डॉक्टर व रूग्ण यांच्यातील विश्वास उडाला तर फार कठीण परिस्थिती होईल. कारण शेवटी आपले नाते विश्वासावर आहे. जेव्हा विश्वासाला धक्का बसतो, तेव्हा डॉक्टर उपचार करताना हजारवेळा विचार करतील. कणकवली व कुडाळ मध्ये नागरीक एकत्र जमले, पाताडे कुटुंबियांना एक समाधान वाटेल. कस्तुरीच्या निधनानंतर ही जागृती झाली, हे शंभर टक्के चांगले आहे.

माजी उपसभापती प्रकाश पारकर म्हणाले,आज कस्तुरी गेली असली तरी तिच्या कुटुंबियांसमवेत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊन चुकीच्या पध्दतीला आळा घालून एकजूटीने लढूया. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुहास पाताडे यानी अशा घटना पंचक्रोशीत यापूर्वीही घडल्या आहेत यासाठी विचार करावा लागेल. चप्पल उगारून डॉक्टरने कलंक लावाला आहे. या घटना परत घडता कामा नये. तर माजी सभापती दिलीप तळेकर यानी पाताडे कुटुंबियाना न्याय मिळाला पाहीजे व डॉक्टरला शासन झाले पाहीजे.

तर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिर्लोटकर म्हणाले,या प्रकरणी जिल्हा व राज्य पातळीवर एकजूटीने लढूया तर संपूर्ण डॉक्टर नव्हे तर डॉक्टर नागवेकर याच्याविरुद्ध आमचा लढा आहे.तर माजी सभापती संतोष कानडे यानी या दुःखात आपण सहभागी असून जो लढा उभा केला आहे. त्या डॉ. मयुर नागवेकर याला जेव्हा सजा मिळत नाही तोपर्यंत कस्तुरीला श्रध्दांजली पूर्ण होत नाही. कसार्डे गावाने हतिहास घडवत एकीचे बळ दाखवून देत जो घात झाला त्याला प्रघात होणे गरजेचे होते.यामुळे आज हा लढा जिल्हाचा लढा म्हणून स्वरूप निर्माण झाले आहे.

नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यानी आज सोशल मीडियावर डॉक्टरांबद्दल वेगवेगळया प्रतिक्रीया येत आहेत तर त्या डॉक्टरने चूक मान्य केली पाहीजे. खंडणीचा आरोप चूकीचा असून सामंजस्याने तोडगा काढला पाहीजे होता. मात्र, आज कस्तुरीचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. तर असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यानी अनंत नागवेकर देव माणूस असून डॉ.मयुर नागवेकर यानी अनेक रुग्णांचे बळी घेतले आहेत. नांदगाव परिसरातही अशा घटना त्याच्याकडून घडल्या असून त्याची डॉक्टरी काळीमा फासणारी आहे.

तर अमोल जमदाडे यानी संपूर्ण घटनाक्रमाचे कथन करून कस्तुरीला वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे होते. मात्र, तीचे ते स्वप्न अधूरे झाले असून पुढील वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल असे सांगितले. यानंतर माजी जि.प.सदस्य संजय देसाई यानी डॉ. मयुर नागवेकर याच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित करत आज पाताडे कुटुंबियातील कस्तुरी निघून गेल्याचे सांगत रूग्णाच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखी घटना घडली असे सांगितले. तर कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज शेलार यानी कोमल कळी फुलण्या अगोदर कोमेजली असल्याने शोककळा पसरली असून तिला न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवून असा लढा चालू राहणार असल्याचे सांगितले.