'बुक्स ऑन व्हील्स' सावंतवाडीत

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2025 19:49 PM
views 19  views

सावंतवाडी : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे राबवण्यात येणारी 'बुक्स ऑन व्हील्स' ही फिरती पुस्तक परिक्रमा आज सावंतवाडीत दाखल झाली. सावंतवाडी बस स्थानक येथे या फिरत्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

पुस्तके ही विचारांची शिदोरी

याप्रसंगी बोलताना विक्रांत सावंत म्हणाले की, "आजच्या मोबाईलच्या युगात तरुण पिढी पुस्तकांपासून दुरावत चालली आहे. मात्र, इतिहास आणि वास्तव्याची सांगड घालून शैक्षणिक व वैचारिक प्रगती साधायची असेल, तर पुस्तक हेच आपले दैवत आहे. ही फिरती बस म्हणजे वाचन चळवळ व्यापक करण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सावंतवाडीतील विद्यार्थी आणि सुज्ञ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा."


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, कणकवली आणि कुडाळ येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये या बसला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत ही बस सावंतवाडीत मुक्कामी असणार आहे. पहिल्याच दिवशी एसटी बस स्थानक परिसरात शेकडो वाचकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, पत्रकार विजय देसाई, अभिमन्यू लोंढे, रुपेश हिराप, कुणकेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, संजय पुनाळेकर, विद्या (निलांबरी) पेडणेकर, रेषा सावंत, तसेच नॅशनल बुक ट्रस्टचे अमित कुमार मिश्रा, सुनील कुमार, गजराज सिंग, जगतसिंग रावत, उमेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.