
कणकवली : कणकवली बाजारपेठेत सैनिक पतसंस्थेतून 1 लाखाची रक्कम काढल्यानंतर ती घेवून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील शबनम पिशवीत 500 रूपयांच्या 100 नोटा असलेली 50-50 हजाराची दोन बंडले हातचलाखीने लंपास केली. याप्रकरणी ज्यांचे पैसे चोरीस गेले ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शशिकांत शंकर साटम ( रा. कणकवली, शिवाजीनगर) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12 वा. यावेळेत घडली. शशिकांत साटम हे मंगळवारी सकाळी हे बाजारपेठेतील सैनिक पतसंस्थेच्या शहर शाखेत पैसे काढण्यासाठी आले होते. पतसंस्थेतून 1 लाखाची रक्कम त्यांनी काढली. त्यांच्याकडील शबनम पिशवीत 500 रूपयांच्या 100 नोटा असलेली दोन बंडले त्यांनी ठेवली होती. काही वेळानंतर त्यांच्या शबनम बँगेची चेन लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आठवडा बाजारात असलेल्या एका दुकानातून दोन हातपिन खरेदी केले. तसेच नोटांची बंडले ठेवण्यासाठी पिशवी मिळाली नसल्याने त्यांनी बाजूलाच एका दुकानातून टॉवेल खरेदी केले. त्याचे पैसे त्यांनी खिशातून काढून दिले. पण त्यावेळी त्यांच्याकडील शबनम बँग हलकी लागली म्हणून त्यांनी खात्री केली असता बँगेतील 50 - 50 हजाराची दोन बंडले बँगेत नसल्याचे दिसून आले. झाल्या प्रकाराने ते हादरले. जवळच्या एका बँकेसमोरील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला मात्र चोरट्यांचा काहीच सूगावा लागला नाही. त्यामुळे शशिकांत साटम यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.










