
दोडामार्ग : माटणे तळेवाडी येथील लक्ष्मी भिको शिरोडकर (वय ५५) यांचा मृतदेह दुचाकी वाहतूक करणाऱ्या उघड्या जीपमध्ये गोवा डिचोली येथे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृत्यू संशयास्पद असून, खुनाचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.
गोवा डिचोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदरवाडा, डिचोली येथील मार्केटजवळील एका इमारतीच्या खाली पार्क केलेल्या उघड्या जीपमध्ये लक्ष्मी शिरोडकर यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या नाकावर जखम असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक तसेच फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पंचनामा करून तपासणी करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीवरून लक्ष्मी शिरोडकर या रात्री परिसरात फिरत होत्या आणि एका व्यक्तीसोबत त्यांचे भांडण झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.










