शासनाने लवकरात लवकर हत्ती हटाव मोहीम राबवावी : गणेशप्रसाद गवस

Edited by: लवू परब
Published on: December 26, 2025 19:26 PM
views 8  views

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी हा वन्य हत्तींचा अधिवास नाहीच. त्यामुळे तिलारीत हत्तींसाठी अधिवास घोषित करा हे पूर्णपणे चुकीचे आहे. हत्तींमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी मेटाकुटीस पावला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हत्ती हटाव मोहीम राबवावी. अन्यथा येत्या पंधरा दिवसात आमच्याच सरकार विरोधात मोठे आंदोलन उभारू, असा इशारा सत्ताधारी पक्षातील शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिला आहे.

तालुक्यातील सर्व हत्ती बाधित गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची आवाहनही त्यांनी केले आहे. दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गुरुदास सावंत, गोपाळ गवस, रामदास मेस्त्री, चेतना गडेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेशप्रसाद गवस पुढे म्हणाले की, हत्ती हे तिलारी खोऱ्यातील मूळ वन्यजीव नाहीत. हे हत्ती अन्नाच्या शोधात कर्नाटक राज्यातून या भागात दाखल झाले आहेत. मागील २३ वर्षांपासून या हत्तींचा उपद्रव सातत्याने वाढत असून शासन, वनविभाग आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.

हत्तींच्या धुडगूसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होत असून काजू, सुपारी, केळी, नारळ, आंबा यासारख्या बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे अर्थकारण कोलमडले असून शेतकरी भीतीच्या वातावरणात जगत आहेत. मात्र शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेत तीव्र संताप उसळत आहे. तिलारीत हत्तींसाठी अधिवास जाहीर करण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. हत्तींच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा डाव असल्यास तो यशस्वी होऊ देणार नाही, असे स्पष्ट शब्दात श्री. गवस यांनी सांगितले. शासनाने लवकरात लवकर येथील हत्ती हटवावेत व शेतकऱ्यांना भयमुक्त जीवन द्यावे. अन्यथा पंधरा दिवसानंतर शासनाविरोधातच आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री गवस यांनी यावेळी दिला. आंदोलनात तालुक्यातील सर्व हत्तीबाधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले.