चौकुळ नं. १ च्या श्रावणीचं गोळाफेकमध्ये उल्लेखनीय यश

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2025 18:47 PM
views 8  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. १ येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी श्रावणी विशाल लातये हिने तालुकास्तरीय गोळाफेक क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीच्या जोरावर तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अधिक उंच, अधिक जलद, अधिक गतिमान या ऑलिम्पिक संकल्पनेनुसार केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हा अशा विविध स्तरांवर स्पर्धा घेतल्या जातात. सावंतवाडी तालुका स्तरावर झालेल्या या स्पर्धेत श्रावणी लातये हिने केंद्र व प्रभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत तालुकास्तर गाठले आणि तेथेही उत्कृष्ट खेळी करत जिल्हास्तरासाठी पात्रता मिळवली. चौकुळसारख्या दुर्गम भागात वर्षातील सुमारे सहा महिने मुसळधार पाऊस असल्याने सरावासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असूनही श्रावणीने दाखवलेली चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळा, केंद्र व तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. या यशाबद्दल प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात केंद्रप्रमुख भावना गावडे यांच्या हस्ते श्रावणीला अभिनंदनपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद तांबोळी, केंद्र मुख्याध्यापिका शितल गावडे, चौकुळ केंद्र संघटक काशिनाथ हसबे, तसेच विद्याधर पाटील, एकनाथ सुतार, गणपती पाटील, सत्यजित वेतूर्लेकर, राहुल वाघदरे, राजेंद्र नाईक, स्वप्निल चौगले, चंद्रकांत सावंत, वसुंधरा सुर्वे, आश्विनी देसाई, अनिता कतगर, किरण माने आदी शिक्षक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी श्रावणीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत जिल्हास्तरावरही ती घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला.