
सावंतवाडी : प्रवाशांना ST बसगाड्यांची अद्ययावत माहिती मिळावी; म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST च्या) प्रत्येक आगारामध्ये (डेपोमध्ये) अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला असतो. मात्र, बर्यााचदा ST आगार आणि नियंत्रण कक्ष येथील अधिकृत संपर्क क्रमांक बंद असतात. अनेक वेळा ‘आऊट ऑफ ऑर्डर’, असा संदेश मिळतो किंवा प्रवाशांनी संपर्क साधल्यास त्याला प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे प्रवाशांची होणारी असुविधा टाळण्यासाठी एस्.टी. आगार आणि नियंत्रण कक्ष यांचे एक लँडलाईन आणि भ्रमणभाष असे संपर्क क्रमांक त्वरित चालू करण्यात यावेत अन् त्याची सूची महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. प्रवाशांनी संपर्क केल्यावर त्याला प्रतिसाद न देणे ही गोष्ट सेवा त्रुटी मानून संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय दायित्व निश्चित करावे आदी मागण्या हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत एस्.टी. प्रशासनाकडे केल्या आहेत. याविषयीचे निवेदन कणकवली येथे एस्.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक आणि सावंतवाडी येथे प्रभारी आगारप्रमुख यांना देण्यात आले. माहिती मिळवण्यास प्रवाशांना कोणतेही विश्वसनीय साधन उपलब्ध नाही. याचा गंभीर परिणाम ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार आणि आपत्कालीन प्रवास करणार्या प्रवाशांवर होत आहे. ही गोष्ट एस्.टी. महामंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रतिकूल परिणाम करणारी आणि सार्वजनिक हिताला बाधा आणणारी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रवाशी हित सुरक्षित रहाणे अपेक्षित आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. प्रभारी आगारप्रमुख किरणकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संपद दळवी, द्वारकानाथ वाडकर, दिलीप आठलेकर, राघोबा निब्रे, शंकर निकम आदी उपस्थित होते.










