
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी लोककलांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या केशवसूत साहित्य नगरीत होणाऱ्या या संमेलनात शनिवार २७ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून लोककला सादरीकरण होणार आहे.
यात आरपीडी हायस्कूलचा वारकरी जागर, आडवी गावच्या महिलांच्या पारंपरिक फुगड्या, पिंगुळी येथील एकनाथ गंगावणे यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, रामायण, सीता स्वयंवर तसेच देवसू गावच्या महिलांच्या तसेच कारिवडे येथील गणपत परब यांच्या लोकगीतांचे सादरीकरण होणार आहे.
याशिवाय संमेलनात कविवर्य आ. सो. शेवरे ग्रंथ दालन असून त्यात कोल्हापूर येथील महाराष्ट्र शासन ग्रंथ भांडार-साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित ग्रंथ, कणकवली येथील विघ्नेश प्रकाशन, गोवा येथील विचार ग्रंथ दालन, तसेच सावंतवाडी येथील क्षितिज वितरणाचा स्टॉल आहे. साहित्य रसिकांनी या ग्रंथ दालनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.










