
सावंतवाडी : भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. सावंतवाडी येथील सर पंचम खेमराज विद्यालय व एसपीके कॉलेज येथे संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील कला, विचारशक्ती, सर्जनशीलता, नेतृत्वगुण तसेच राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे हा होता. याअंतर्गत चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व, वेशभूषा (फॅन्सी ड्रेस), पोस्टर मेकिंग आणि सांस्कृतिक नृत्य अशा सहा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी A-3 साइज पेपरवर वॉटर कलरने अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास प्रभावीपणे रेखाटला, तर निबंध स्पर्धेत त्यांच्या देशहितासाठीच्या कार्याचा सखोल आढावा मांडण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेत अटलजींच्या नेतृत्वगुणांवर आणि राष्ट्रउभारणीतील योगदानावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. वेशभूषा स्पर्धेत भारतासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत देशभक्तीपर घोषवाक्ये व संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले, तर सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली.
पारंपरिक नृत्य स्पर्धेत कोलगाव माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समई नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक एस. एल. देसाई विद्यालय, पाट तर तृतीय क्रमांक मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी मिळवला. चित्रकला स्पर्धेत कु. अर्जुन राजेश शिर्के (मदर क्वीन स्कूल, सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत वैदही दत्ताराम म्हाडगूत (जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस) प्रथम ठरली. वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी शंकर कोठावळे (आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. वेशभूषा स्पर्धेत कु. श्रावणी दिनेश सावंत (राजा शिवाजी विद्यालय, विलवडे) प्रथम ठरली, तर निबंध स्पर्धेत अक्षरा न्हानू धुमक (जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस) हिने प्रथम क्रमांक मिळवला.
या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष दीपक पाटेकर व प्रा. रुपेश पाटील यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा युवराणी श्रद्धा राजे भोसले, मानसी परब, अनुजा साळगावकर, संदीप साळसकर तसेच कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कोकण संस्थेचे रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत व सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन दयानंद कुबल यांनी मानले.










