
सावंतवाडी : शहरातील जिमखाना मैदान क्रमांक १ व २ ही मैदाने क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक अथवा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देऊ नयेत, अशी मागणी शहरातील क्रीडाप्रेमींनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात नगरपालिकेच्या आगामी बोर्ड मीटिंगमध्ये ठराव मंजूर करावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी शहराला ऐतिहासिक आणि क्रीडा परंपरेचा मोठा वारसा असून जिमखाना मैदान क्रमांक १ व २ ही मैदाने स्थानिक खेळाडू, शालेय विद्यार्थी व तरुण खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, गेल्या काही काळात ही मैदाने खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने दिली जात असल्याने मैदानांची दुरवस्था होत आहे.प्रदर्शने व मोठ्या कार्यक्रमांमुळे मैदानावर खोदकाम, जड वाहनांची ये-जा होत असून खेळासाठीचा पृष्ठभाग खराब होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा व अस्वच्छता राहात असल्याने खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. वारंवार होणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे खेळाडूंच्या नियमित सरावातही अडथळा निर्माण होत असून त्याचा परिणाम त्यांच्या क्रीडा कामगिरीवर होत असल्याचे क्रीडाप्रेमींनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, क्रीडा संस्कृती जपण्यासाठी आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून जिमखाना मैदान १ व २ ही मैदाने केवळ क्रीडा स्पर्धा व सरावासाठीच राखीव ठेवावीत, तसेच कोणत्याही परिस्थितीत लग्नकार्य, प्रदर्शने किंवा व्यावसायिक मेळाव्यांसाठी भाड्याने देऊ नयेत, असा ठराव नगरपालिकेने घ्यावा, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे. यावर नगरपालिकेकडून सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.










