लोकसहभागातून जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

अवघ्या एका दिवसात तळेखोल ग्रा. पं. कडून तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी
Edited by:
Published on: December 26, 2025 16:50 PM
views 22  views

दोडामार्ग : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायत तळेखोल यांच्या वतीने जलसंवर्धनाचा एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या एका दिवसात तीन वनराई बंधारे उभारून ग्रामपंचायतीने पाणी साठवणुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व सरपंच वंदना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, गिरीजा दळवी, सुरेखा शेळके, शाम गवस, सिंचल सावंत, उर्मिला गवस तसेच ग्रामस्थ श्रीमती राधिका सावंत, लता नाईक, अंबिका दळवी, रेणुका नाईक, ऋषी सावंत, नारायण सावंत, पंकज गवस, अक्षय सावंत, अनिकेत सावंत, अनिल सावंत, लता नाईक, मनीष सावंत यांच्यासह इतर अनेक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कामात ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र सावंत व गणपत दळवी यांनी मोलाची मदत केली.

सदर कार्यक्रमाच्या स्थळी तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, सहाय्यक कृषी अधिकारी दोडामार्ग विवेक सोनवणे, उपकृषी अधिकारी ए. एस. कोळी, ग्राम विस्तार अधिकारी एसे जाधव तसेच ग्रामपंचायत अधिकारी अमित दळवी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

गावातील ओढे व नैसर्गिक जलप्रवाहांवर उभारण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून, त्याचा थेट फायदा भूजल पातळी वाढीस होणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी, जनावरे तसेच संपूर्ण ग्रामस्थांना दीर्घकालीन लाभ होणार आहे. लोकसहभागातून यशस्वीरीत्या राबविण्यात आलेला हा जलसंवर्धन उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, भविष्यातही जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी असेच उपक्रम राबविण्याचा मानस ग्रामपंचायत तळेखोलने व्यक्त केला आहे.