
सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ (इस्कॉन), सावंतवाडी शाखेच्या वतीने रविवार, २१ डिसेंबर रोजी शहरात भव्य 'भजनसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा सोहळा रंगणार असून, यानिमित्ताने अध्यात्मिक विचारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इस्कॉनचे जगदविख्यात गुरु महाराज प.पू. लोकनाथ स्वामी महाराज आणि अमेरिकन संन्यासी प.पू. श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज यांची प्रवचने होणार आहेत. तसेच नोएडा येथील श्रीमान सुबल गोपाल प्रभू यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. कार्यक्रमात भजन, कीर्तन आणि विशेष नाटिकेचे सादरीकरण केले जाणार असून, सांगता 'महाप्रसादाने' होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत इस्कॉनचे शाखा प्रमुख सहस्त्रनाम प्रभूजी, सावंतवाडी शाखा अध्यक्ष विजय राऊळ, व्हाईस चेअरमन प्रकाश रेडकर, सचिव राजेश वाडकर, सदस्य उदय भराडी आणि देवकीपुत्र प्रभूजी उपस्थित होते.
शाखा अध्यक्ष विजय राऊळ यांनी सांगितले की, प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांनी भारतात २५ हून अधिक मंदिरे उभारली असून पंढरपूर येथेही मोठे सेवाकार्य सुरू आहे. इस्कॉन संस्था जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांत भागवत धर्म आणि भगवद्गीतेचा प्रचार करत आहे.सावंतवाडी शाखेला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत.
लवकरच सावंतवाडीतील शाळांमध्ये भगवद्गीतेवर आधारित परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. मानवी जीवनात भक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यक्तीची चेतना बदलण्याचे कार्य भक्तीद्वारे घडते. मनुष्य जन्म आणि जीवन पूर्णतृप्त कसे करावे, याचे मार्गदर्शन या भजनसंध्येच्या माध्यमातून केले जाईल. सावंतवाडी आणि परिसरातील भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन सावंतवाडी व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.










