
सावंतवाडी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास नितेश राणे यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी सफाई कामगारांचे प्रतिनिधी सुनील परब, संदीप पाटील, आणि नितीन कदम यांनी निवेदन सादर केले.
या निवेदनाद्वारे, सावंतवाडी नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणीतील १७ कामगारांना वारसा हक्क नुसार कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद खंडपीठाच्या महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी विनंती करण्यात आली. शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले की, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील बीड, गेवराई, कराड, शिर्डी, रत्नागिरी, आणि देवगड या ठिकाणच्या सफाई कामगारांना पूर्वीच नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे सावंतवाडीतील कामगारांनाही त्याच धर्तीवर समाविष्ट करून घ्यावे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सफाई कामगारांच्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता २१ डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच सावंतवाडी नगरपरिषदेतील या सफाई कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
या भेटीदरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील साकव दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंतीही पालकमंत्री नितेश राणे यांना केली. या मागणीवरही त्यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले असून, या साकवाचे दुरुस्तीचे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल, असे स्पष्ट केले.













