
वैभववाडी : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लि.च्या संचालकपदी वैभववाडीचे सुपुत्र, मुंबई बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक श्री. पुरुषोत्तम दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे सिंधुदुर्गासह वैभववाडी तालुक्याचा सहकार क्षेत्रातील मान अधिक उंचावला आहे.
सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या राज्यस्तरीय फेडरेशनमध्ये श्री.दळवी यांची झालेली निवड ही त्यांच्या दीर्घ अनुभवाची, कार्यक्षम नेतृत्वाची आणि सातत्यपूर्ण कामगिरीची पावती मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
दळवी हे अनेक वर्षे मुंबई बँकेत संचालक म्हणून कार्यरत असून काही काळ त्यांनी बँकचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा व्यापक प्रभाव असल्याने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.श्री.दळवी यांच्या निवडीनंतर तालुक्यातील विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्रात आणखी सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













