
सावंतवाडी : सहकाऱ्यासोबत शिकारीसाठी गेलेल्या वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज (वय - २८) या युवकाचा शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस (वय ३५, रा. कोलगाव) ला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या घटनेत वापरलेली बंदूक, घटनास्थळावरील छर्रे पोलिसांनी जप्त केले असून, शिकारीसाठी वापरलेली जुपिटर दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.












